शशांक मनोहर बीसीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध

शशांक मनोहर बीसीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांची रविवारी निवड झाली. पेशाने वकील असलेले विदर्भवासी मनोहर दुस-यांदा अध्यक्ष झाले. यापूर्वी २००८-११ या कालावधीत त्यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले होते. मनोहर दोन्ही खेपेस बिनविरोध निवडून आले.

बीसीसीआयच्या मुंबईतील मुख्यालयात झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. अध्यक्षपदासाठी मनोहर यांचा एकमेव अर्ज होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित होती.

रविवारच्या बैठकीत केवळ सोपस्कार उरकण्यात आले. पूर्व विभागातर्फे मनोहर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्याला सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले. २०१७पर्यंत बीसीसीआय अध्यक्षपदासाठी पूर्व विभागाचा ‘टर्न’ आहे. या विभागातील सहाही क्रिकेट असोसिएशनन्सनी मनोहर यांना यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला होता.

मनोहर यांना प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. शिवाय त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. परिणामी त्यांना विरोध झाला नाही. कुशल प्रशासक जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर अध्यक्षपद रिक्त झाले होते.

रविवारच्या बैठकीला बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांच्यासह मुंबई क्रिकेट असोसिएशन्सचे (एमसीए) अध्यक्ष शरद पवार, आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला, माजी कर्णधार आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचा (सीएबी) नवा अध्यक्ष सौरव गांगुली आदी मान्यवर उपस्थित होते.

दालमिया यांच्या निधनानंतर अध्यक्षपदासाठी आयसीसी आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांच्यासह आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांचे नाव चर्चेत होते.

मात्र आयसीसी आणि तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे (टीएनसीए) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी नवी खेळी करताना शरद पवार यांची भेट घेत मनोहर यांच्याकडे बीसीसीआयची सूत्रे सोपवली. मनोहर हे पवारांचे विश्वास आहेत. त्यामुळे पवारांचा शब्द ते टाळू शकले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *