1.20 लाखांना खरेदी केलेला बंगला 276 कोटींना विकला जातो तेव्हा… कोणी खरेदी केलं मुंबईतील सर्वात महागडं घर?

मुंबई… मायानगरी मुंबई… अशीच या शहराची ओळख. अगदी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असो किंवा मग आर्थिक चणचण असणारे सामान्य नागरिक असो. या शहरानं अनेकांनाच आसरा दिला. अशा या लखलखत्या शहरात नुकताच एक सर्वात महागडा व्यवहार झाला असून शहरात ऐतिहासिक महत्त्वं असणारा लक्ष्मी निवास बंगला नुकताच विकला गेला आहे.

मुंबईतील नेपियन सी रोड इथं असणाऱ्या या बंगल्याची महत्त्वाची ओळख म्हणजे स्वातंत्र्यसैनिकांचं गुप्त आश्रयस्थान. 1940 च्या दशकात भारत छोडो चळवळीदरम्यान स्वातंत्र्यसैनिक याच बंगल्याचा वापर गुप्त आश्रयस्थान म्हणून करत होते. अशा या बंगल्याची तब्बल 2760000000 रुपये अर्थात 276 कोटी रुपयांना विक्री झाली आहे. Zapkey नं प्रसिद्ध केलेल्या माहितीच्या आधारे हे वृत्त सध्या शहरातील रिअल इस्टेट क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे. जी वास्तू कधी एकेकाळी स्वातंत्र्य चळवळीसाठी ओळखली जात होती, तिच वास्तू सध्या मुंबई शहरातील सर्वात महागडी विक्री मूल्य असणारी वास्तू ठरली आहे असं झॅप्स्कीनं म्हटलं आहे.

उपलब्ध कागदपत्रांनुसार 19,891 sq ft (चौरस फूट) ची संपत्ती असणाऱ्या कपाडिया कुटुंबाकडे या लक्ष्मी निवास कुटुंबाची मालकी असून त्यांनी हा बंगला आणि आजुबाजूचा परिसर वागेश्वरी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांना विकला आहे. या संस्थेच्या निर्देशकपदी इलिना निखिल मेस्वानी असून, त्या रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये कार्यकारी निर्देशकपदी असणाऱ्या निखिल मेस्वानी यांच्या पत्नी असल्याचं सांगितलं जातं.

अधिकृत माहितीनुसार या भूखंडावर (बिल्ट अप क्षेत्र) 19,891.87 चौरस फुटांच्या भूभागावर बांधकाम करण्यात आल्याचं दाखवण्यात येत आहे. 28 फेब्रुवारी 2025 रोजी या व्यवहाराची अधिकृत नोंदणी करण्यात आली ज्यामध्ये भूखंड विक्रेत्यांमध्ये 15 जणांच्या नावाचा उल्लेख असून यात उपेंद्र त्रिकमदार कपाडिया यांच्याही नावाचा समावेश आहे. तर, खरेदीदा वागेश्वरी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था असल्याचं इथं पाहायला मिळत आहे. सदर भूखंडावर बांधकामाचं क्षेत्र आणि उर्वरित भाग असा एकूण 2221 चौरस फुटांचा भाग असून यामध्ये तळमजला आणि वरील दोन मजल्यांचं बांधकाम असणारी बंगल्याची वास्तू चर्चेचा मुद्दा ठरत आहे.

लक्ष्मी निवास बंगल्याचं महत्त्वं काय? 

मुंबईतील नेपियन सी रोड इथं असणारा लक्ष्मी निवास बंगला भारच छोडो चळवळीदरम्यान अनेक स्वातंत्र्यसैनिकांसाठी एक गुप्त आश्रयस्थान होता. साधारण 1942 ते 1975 दरम्यान इथं अनेक स्वातंत्र्यसैनिकांचा राबता होता. माध्यमांच्या वृत्तानुसार समुद्राचं विहंगम दृश्य पाहता येणाऱ्या या बंगल्यानं राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, अच्युत पटवर्धन, अरुणा असफ अली यांना 40 च्या दशकात आश्रय दिला होता. इतकंच नव्हे, तर नेताजी सुभाषचंद्र बोस याच्या आझाद हिंद रेडिओसाठी हा बंगला प्रक्षेपण केंद्राच्या भूमिकेत होता.

भूतकाळात डोकावलं असता या बंगल्याचा सर्वप्रथम व्यवहार कपाडिया कुटुंबानं एका पारशी कुटुंबाशी केला होता. जिथं त्यांनी 1917 काळात 1.20 लाख रुपये मोजत ही वास्तू खरेदी केली. दरम्यान सध्याच्या घडीला या वास्तूची एकंदर जागा पाहता रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते इथं 45000 चौरस फुटांचं बिल्ट अप क्षेत्रा उभारण्याची क्षमता असल्यानं आता या ठिकाणाचा विकास नेमका कसा केला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *