नागपूरमधील तणावाची परिस्थिती सध्या निवळताना दिसत असली तरीही इथं काही भागांमध्ये मात्र अद्यापही संचारबंदीचे निर्देश लागू असल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी नागपूरमध्ये झालेल्या दोन गटांतील हिंसेनंतर ही परिस्थिती उदभवली असून, त्याचसंदर्भात नागपूरचे सायबर क्राईम पोलीस उपायुक्त लोहीत मतानी यांनी काही महत्त्वाची माहिती एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. यावेळी त्यांनी सदर प्रकरणी 6 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं म्हटलं.
फहीम खान चं नाव घेत त्याच्यावर सदर प्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. इतकंच नव्हे तर, चिथावणीखोर व्हिडीओ तयार करणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देत घटनेतील आरोपी नागपूरचे नसल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं. फहीम खानला सध्या घटनेमागचा मास्टरमाईंड म्हणता येणार नाही. पण, या घटनेस कारणीभूत असणाऱ्यांपैकी तोसुद्धा एक असल्याची बाब त्यांनी यावेळी अधोरेखित केली.
