वंदे भारत ट्रेनचा स्पीड कमी का झाला? रेल्वेमंत्र्यांनी उत्तर देत सांगितले कारण

प्रिमीयम ट्रेन म्हणून वंदे भारतचं नाव घेतलं जातं. वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस आहे. मात्र आता वंदे भारतच्या वेगावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. ज्या ट्रेनच्या ज्या वेगाचा दावा करण्यात आला होता तितकासा वेग ट्रेन पकडत नसल्याचे समोर आले आहे. याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी काही कारणं सांगितली आहेत. ज्यामुळं ट्रेनचा वेग कमी झाला आहे.

रिपोर्टनुसार, चेन्नईच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीत तयार झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग 160 किमी प्रति तास वेगाने धावत आहे. मात्र, या आधी झालेल्या चाचणीत हीच ट्रेन 180 किमी प्रति तास वेगाने धावताना दिसत होती. मात्र आता ट्रेनचा वेग इतका कमी का झाला? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.

संसदेत काही सदस्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. सुपरफास्ट रेल्वे म्हणून दावा करण्यात येणाऱ्या ट्रेनचा वेग कमी का? सरकारची योजना काय आहे? ट्रेन पूर्ण स्पीडने चालवण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहेत आणि ते कधीपर्यंत होऊ शकतं, असे सवाल संसदेत उपस्थित करण्यात आले होते.

वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचा वेग कमी का झाला? याबाबत रेल्वे मंत्र्यांनी उत्तर दिलं की, रेल्वेचा वेग हा फक्त इंजिनवरच अवलंबून नसतो तर ज्या रूळांवर ट्रेन धावते त्याची अवस्थादेखील लक्षात घ्यायला हवी. रेल्वे रूळांची देखभाल करण्याचे काम सुरू आहे. 2014 पर्यंत फक्त 31000 किमी रेल्वे रूळांवर ट्रेन 110 किमी प्रति तास वेगाने किंवा त्यापेक्षा अधिक वेगाने धावू शकत होती. मात्र आता ही मर्यादा जवळपास 80000 किमीपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच सर्वाधीक लांबीच्या रुळांवर ट्रेन वेगाने धावू शकते.

आज देशभरात 136 वंदे भारत ट्रेन धावतात. ही भारतातील सर्वात फास्ट ट्रेन आहे. जवळपास सर्वच मार्गावर वंदे भारत ट्रेन धावते. त्यामुळं प्रवाशांनाही दिलासा मिळाला आहे. मात्र काही मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेसला कमी प्रतिसाद मिळत आहे. तर, काही ठिकाणी वंदे भारत प्रवाशांची पहिली पसंती ठरली आहे. आरामदायक प्रवास आणि किफातयशीर दर यामुळं प्रवाशी वंदे भारत एक्स्प्रेसला पर्याय निवडत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *