महिलेला ह्यूमन कोरोनाची लागण झाल्यानं चिंतेत वाढ; काय आहेत लक्षणं?

 जवळपास दोन ते तीन वर्ष साऱ्या जगाचा जीव धोक्यात आणणाऱ्या कोरोना विषाणूवर लस मिळाली आणि त्यानंतर कुठे या संसर्गजन्य किंबहुना विषाणूजन्य आजाराचं सावट कमी होण्यास सुरुवात झाली. Lockdown च्या आव्हानात्मक काळातून तरून सारं जग पुढे आलं आणि आता कुठे अनेकांची जीवनशैली आणि कार्यपद्धती पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा एकदा एक नवं सावट डोकं वर काढताना दिसत आहे. कारण ठरतेय कोरोना किंवा HKU1ची महिलेला झालेली लागण.

कोलकाता इथं एका महिलेला ह्यूमन कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. HKU1 हासुद्धा कोरोनाचाच एक प्रकार असल्यामुळं अनेकांनीच यासंदर्भात चिंतेचा सूर आळवला आहे. विविध अहवालांनुसार HKU1 हा सहसा एक श्वसनाशी संबंधित सर्वसामान्य आजार असून, यामध्ये Covid 19 प्रमाणं महामारीसम परिस्थिती निर्माण करण्याची क्षमता नसल्याचं म्हटलं जात आहे. कारण, तो एक नव्यानं उत्पत्ती झालेला विषाणूजन्य आजार होता.

आरोग्य विशेषज्ज्ञांच्या मते HKU1 ची सर्वप्रथम माहिती 2005 मध्येच जगासमोर आली होती. कोविडप्रमाणं HKU1 हा कोणताही नवा विषाणू नसून बहुतांश नागरिकांना कधी ना कधी या विषाणूची लागण होते आणि काही काळासाठी त्यामुळं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, असंही तज्ज्ञांनी स्पष्ट केलं.

HKU1 विषाणूनं जर शरीरातील श्वसन यंत्रणेवर हल्ला केला तर, सर्वसाधारण सर्दी- खोकला आणि ताप अशी लक्षण एखाद्या व्यक्तीमध्ये आढळू शकतात. या विषाणूची लागण झाल्यास ताप आणि त्याआधीचीच लक्षणं आणि शरीरातील बदल जाणवतात. यामध्ये घसा खवखवणं, सर्दी वाढणं, सायनस बंद होणं, डोकेदुखी, ताप, थकवा अशी प्राथमिक लक्षणं आढळतात. तर, काही प्रकरणांमध्ये हा संसर्ग न्युमोनिया आणि ब्रोंकायटीससारख्या व्याधींना वाव देतो.

HKU1 हा सामान्य संसर्ग असून, तो शरीरातील अंतर्गत रोगप्रतिकारक शक्तीच्या बळावर आपोआप बरा होतो. मात्र ज्येष्ठ नागरिक आणि कोमॉर्बिडीटी म्हणजेच सहव्याधी असणाऱ्यांनी मात्र हा विषाणूची लागण झाल्याच काळजी घेणं अपेक्षित असतं.

ह्युमन कोरोना व्हायरस म्हणजेच HKU1 आणि कोविडच्या नावांमध्ये बहुतांशी साधर्म्य असल्यामुळेच सध्या नागरिकांमध्ये या संसर्गांसंदर्भात भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. ‘कोरोना’ या नुसत्या नावानंच अनेकांना घाम फुटला असला तरीही प्रत्यक्षात या संसर्गानं घाबरून जाण्याचं कोणतंच कारण नाही हेच तज्ज्ञ सुचवत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *