हाय गर्मी! पूर्वेकडील वाऱ्यांमुळे मुंबईची भट्टी; राज्यातही भीषण तापमान वाढ, सध्याचा आकडा 39.4 अंश सेल्सिअस

देशात सुरु असणाऱ्या हवामान बदलांचे थेट परिणाम आता विविध राज्यांमध्ये दिसत असून, मुंबई शहरही याला अपवाद ठरलेलं नाही. शहरासह महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये प्रचंड तापमानवाढ होत असतानाच विदर्भातही सूर्यामुळं प्रचंड होरपळ होताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पूर्वेकडून येणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांमुळं मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये प्रचंड तापमानवाढ पाहायला मिळत आहे. पुढील 24 तासांमध्ये ही तापमानवाढ आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे.

अबी समुद्रामध्ये सध्या उच्च दाबाची स्थिती निर्माण झाली असून, त्यामुळं समुद्राच्या पृष्ठावरून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग मंदावला आहे. ज्यामुलं पूर्वेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांचं प्रमाण वाढलं असून, त्याच कारणास्तव राज्याच्या किनारपट्टी क्षेत्रात प्रचंड तापमानवाढ पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नजीकच्या भागांमध्ये ही स्थिती पाहता उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थितीचा इशारा जारी करण्यात आला आहे.

एकिकडे राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद सोलापुरात करण्यात आली असून, हा आकडा 39.4 अंशांपर्यंत पोहोचला आहे. तर, दुसरीकडे मुंबईतही तापमान 37 अंशांवर पोहोचलं असून, पुढील 48 तासांमध्ये या तापमानात किमान 2 ते 3 अंशांची वाढ अपेक्षित असल्याचं सांगितलं जात आहे.

केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं तापमानाची आकडेवारी जारी केल्यानंतर मुंबईमध्ये मार्च महिन्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद 28 मार्च 1956 रोजी करण्यात आल्याची बाब आढळते. सध्या राज्यातील उकाडा पाहता याच दिवसाची पुनरावृत्ती झाल्याच आश्चर्य वाटू नये असंच तज्ज्ञांचं मत. दरम्यान उकाड्याच्या या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सूती कपड्यांचा वापर करत भर उन्हात दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा इशारा नागरिकांना देण्यात येत आहे.

देश स्तरावर पाऊस अन् बर्फाचा मारा…

उत्तराखंडच्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये शुक्रवारी पावसाची हजेरी राहण्यासोबतच काही भागांमध्ये हिमवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, हिमाचलच्या मैदनी भागांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमध्ये उंच पर्वतरांगांमध्ये हिमवृष्टीचं प्रमाण वाढणार असून, खोऱ्याच्या इतर भागांमध्ये मात्र पावसाचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. देशाच्या उत्तरेकडे एकाएकी तापमानात घट झाली असून, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या पर्वतीय भागांवरून वाहणाऱ्या वाऱ्यांसमवेत सक्रिय असणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळं ही स्थिती उदभवल्याचं सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *