उल्हास नदीवर वरच्या भागात धरणांची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे बदलापुरच्या पुराचा प्रश्न कमी होईल. त्याचसोबत नदी खोलीकरण आणि गाळ काढण्याच्या कामासाठी आवश्यक त्या गोष्टी केल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी फडणवीस आले होते. त्यावेळी शहरातील रखडलेली पाणी योजना, मेट्रो १४, उड्डाणपूल अशा सर्व विषयांवर तात्काळ दिलासा देण्याचेही आश्वासन बोलताना दिले.
बदलापूर शहराच्या पश्चिमेला उल्हास नदी किनारी आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी किसन कथोरे यांनी रस्ते, मेट्रो १४, महामार्गांचे सेवा रस्ते, रखडलेली पाणी योजना, सॅटीस प्रकल्प, उड्डाणपुलांचे रखडलेले काम अशा विविध प्रश्नांची यादीच फडणवीस यांच्यासमोर वाचून दाखवली. त्याचवेळी बदलापूर शहराला शिवकालीन शहराचा दर्जा देण्याचीही मागणी त्यांनी केली.