मुंबई – नाशिक प्रवास जलद आणि वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी वाहनचालक-प्रवाशांना जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या मुंबई – नाशिक महामार्गावरील वडपे – ठाणे दरम्यानच्या २३.८०० किमी लांबीच्या महामार्गाचे आठ पदरीकरण आणि काँक्रीटीकरणाचे आतापर्यंत ७० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम जूनपर्यंत पूर्ण करून ठाणे – वडपे प्रवास सुकर आणि जलद करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.
नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरून नाशिक – मुंबईदरम्यान प्रवास करताना वाहनचालक-प्रवाशांना वाहतूक कोंडीत अडकावे लागते. हा प्रवासासाठी अतिरिक्त वेळ खर्च करावा लागतो. त्यातही पावसाळ्यात प्रवासी-वाहनचालकांच्या अडचणीत आणखी वाढ होते. पावसाळ्यात हा महामार्ग खड्डेमय होतो आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न आणखी गंभीर बनतो. एकूणच नाशिक-मुंबई प्रवास वाहनचालक-प्रवाशांसाठी डोकेदुखी बनत आहे. वाहनचालक-प्रवाशांची हीच डोकेदुखी दूर करत नाशिक-मुंबई प्रवास सुकर करण्यासाठी १४२ किमी लांबीच्या महामार्गाचे आठ पदरीकरण आणि काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १४२ किमीपैकी ११८.२० किमी लांबीच्या मार्गाचे आठ पदरीकरण आणि काँक्रीटकरणाचे काम राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) करीत आहे. वडपे – ठाणे दरम्यानच्या २३.८०० किमी लांबीच्या महामार्गाचे काम एमएसआरडीसी करीत आहे. एमएसआरडीसीने मे. एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हल्पर्सच्या माध्यमातून सप्टेंबर २०२२ मध्ये ११८२ कोटी ८७ लाख रुपये खर्चाच्या कामाला सुरुवात केली आहे. करारानुसार हे काम सप्टेंबर २०२४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र या कामास विलंब झाला आहे. त्यामुळे वाहनचालक-प्रवाशांची वाहतूक कोंडीमुक्त आणि जलद प्रवासाची प्रतीक्षा लांबत आहे. आजही वडपे – ठाणे दरम्यानच्या प्रवासासाठी २५ ते ३० मिनिटांऐवजी एक ते दीड तास लागत आहे. पण आता लवकरच ठाणे – वडपे प्रवास २५ ते ३० मिनिटात पार करणे शक्य होणार आहे.
एमएसआरडीसीने वडपे – ठाणे महामार्गाच्या आठ पदरीकरण आणि काँक्रीटीकरणाच्या कामाला वेग दिला आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ७० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून उर्वरित काम जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी दिली. आठ पदरीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाल्यास जूनअखेरपासून प्रवासी-वाहनचालकांचा वडपे-ठाणे आणि पर्यायाने नाशिक-मुंबई प्रवास सुकर, जलद होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.