वेळापूरजवळ वाहनांची धडक बसून बिबट्याचा मृत्यू; जखमी अवस्थेत दोघांवर केला हल्ला

पंढरपूर-आळंदी पालखी मार्गावर माळशिरस तालुक्यातील वेळापूरजवळ दसूर गावच्या हद्दीत वाहनाची धडक बसून एका बिबट्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. मात्र बिबट्याने जखमी अवस्थेत दोघाजणावर हल्ला केला. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. दरम्यान प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार अपघातस्थळी तीन बिबटे रस्ता ओलांडत होते. त्यातील एका बिबट्याला वाहनाची धडक बसली. तर बचावलेल्या दोन बिबट्यांनी धूम ठोकली. जखमी अवस्थेत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चंद्रसेन रामचंद्र रणवरे (वय २९) आणि समाधान खपाले (वय २५, दोघे रा. दसूर पाटी, ता. माळशिरस) हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या एका खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

सोलापूर जिल्ह्यात अलीकडे अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरचा अपवाद वगळता सर्व नऊ तालुक्यांमध्ये बिबट्यांचा वावर दिसून येतो. बार्शी तालुक्यात बिबट्यांबरोबर गेल्या पावणे दोन महिन्यापासून वाघाची दहशत पाहायला मिळते. गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्यांसह अन्य जनावरांवर बिबटे आणि वाघाकडून हल्ले होऊन त्यांचा फडशा पाडला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात निर्माण झालेली दहशत अद्यापि कायम आहे. बिबटे आणि वाघाला जेरबंद करण्यासाठी वनखात्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले नाही.

या पार्श्वभूमीवर पंढरपूर-वेळापूर पालखी मार्गावर दसुर पाटीजवळ रात्री एका वाहनाची धडक बसून बिबट्याचा मृत्यू झाला. बसताच बिबट्या उडून रस्त्याच्या बाजूला खाली पडला. त्यावेळी अपघातामुळे आलेला आवाज ऐकून चंद्रसेन रणवरे या तरुणाने तेथे धाव घेतली असता जखमी अवस्थेत बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. त्याचवेळी वाचण्यासाठी आलेल्या समाधान खपाले या तरुणावरही बिबट्याने हल्ला केला. प्रत्यक्षदर्शी महेश कापसे याने, अपघातस्थळी तीन बिबटे रस्ता ओलांडत होते. त्यातील दोन बिबट्यांनी धूम ठोकल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर आणि वेळापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी भाऊसाहेब गोसावी यांनी तात्काळ धाव घेतली. माळशिरस वन परिक्षेत्राचे अधिकारी राजेंद्र आटोळे व त्यांची यंत्रणाही धावून आली. अपघातात मृत्युमुखी पडलेला बिबट्या नर जातीचा असून न्यायवैद्यक तपासणीसाठी बिबट्याचा मृतदेह पुण्यात हलविण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *