मुंबईत मागील काही वर्षांमध्ये अनेक चाळी आणि बैठ्या वस्त्यांची जागा गगनचुंबी इमारतींनी घेतली. शहरातील मोठ्या भूखंडांवर स्थित असणाऱ्या बीडीडी चाळीसुद्धा इथं अपवाद ठरल्या नाहीत. शहरातील इतिहासाचीसुद्धा पाळंमुळं असणाऱ्या आणि अनेक मध्यमवर्गीय कुटुंबाचा निवारा असणाऱ्या बीबीडी चाळींचा पुनर्विकास सुरु झाला असून, आता लवकरच बदलत्या मुंबई शहराचं एक नवं पर्व सर्वांसमोर येणार आहे.
लहान घरं, चिंचोळी शेरी, जुन्या इमारती अशा परिस्थितीमध्ये कैक दशकं वास्तव्यास असणाऱ्या अनेक कुटुंबांना आता लवकरच त्यांच्या आलिशान आणि प्रशस्त घराच्या चाव्या मिळणार आहेत. मुंबईतील वरळीमध्ये नव्यानं बांधण्यात आलेल्या इमारतींमध्ये बीडीडी चाळीतील रहिवाशांना मार्च 2025 पर्यंत त्यांच्या हक्काच्या घराचा ताबा मिळणार आहे. MHADA च्या हाती सध्या शहरातील नायगाव, वरळी, ना म जोशी मार्ग इथं असणाऱ्या बीडीडी चाळींच्या विकासाची जबाबदारी असून, राज्य शासनानंही या पुनर्विकास प्रकल्पाला सकारात्मक पाठींबा दिल्याचं पाहायला मिळालं आहे.
पुनर्विकासाअंतर्गत केल्या जाणाऱ्या या प्रकल्पामध्ये पात्र घर मालकांना 500 चौरस फुटांचं दोन बेडरूम असणारे फ्लॅट दिले जाणार असून, याच भागात असणाऱ्या झोपडपट्टीधारकांना झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याअंतर्गत घरं दिली जाणार आहेत. जिथं त्यांना 300 चौरस फुटांचं घर दिलं जाणार आहे.
बीडीडीच्या रहिवाशांसाठी उभारण्यात आलेली ही नवी घरं वरळी इथं स्थित असून, इमारत क्रमांक 1 च्या D आणि E विंगमधील तयार घरांचा ताबा लवकरच दिला जाणार आहे. हा पुनर्विकास प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये पूर्ण केला जाणार असून, पहिल्या टप्प्यामध्ये 5198 रहिवाशांना हक्काच्या घरात जाता येणार आहे. वरळीतील या प्रकल्पासाठी तब्बल 22,901.25 कोटी इतका खर्च करण्यात आला असून, इथं प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर रहिवाशांना शाळा, रुग्णालयं, रिक्रिएशनल स्पेस आणि इथं वास्तव्याजोग्या सर्व सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत. त्यामुळं 160 चौरस फुटांच्या लहानशा घरात दिवस काढणाऱ्या या रहिवाशांना नवं घर मिळताच त्यांनी खऱ्या अर्थानं नशीब काढलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही.