दक्षिण मुंबईहून अटल सेतूला अतिजलद पोहचता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ४.५ किमीचा शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्प हाती घेतले आहे. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे मागील काही वर्षापासून या प्रकल्पाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. पण आता मात्र हे काम वेग घेणार आहे. कारण या प्रकल्पातील सर्व अडचणी दूर झाल्या असून आता लवकरच प्रकल्पाचा एक भाग असलेल्या प्रभादेवी (एल्फिन्स्टन) पुलाच्या जागी नवीन दुमजली पूल बांधण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांतच सध्याचा प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी बंद करून त्याचे पाडकाम केले जाणार असून या जागी दुमजली पूल उभारल्यानंतर प्रवासी-वाहनचालकांचा दक्षिण मुंबई – नवी मुंबई प्रवास अतिजलद होणार आहे. दरम्यान प्रभादेवी पूल किमान एक वर्ष बंद राहणार आहे.
