त्याग करण्याची क्षमता असणाऱ्यांकडेच दातृत्व असते. देणे म्हणजेच त्याग. त्यागातसुद्धा आनंद असून, तो घेता आला पाहिजे आणि अशा दातृत्व अन् त्यागाची भारत देशाची संस्कृतीच असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांनी काढले.
येथील जनकल्याण प्रतिष्ठान व सरस्वती शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, संचालक, तसेच अनेक सेवाभावी संस्थांनी एकत्रितपणे राबवलेल्या ‘दातृत्वाचे दान’ उपक्रमातंर्गत ‘दातृत्वाचे दान समर्पण’प्रसंगी हिरेमठ प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. जनकल्याण प्रतिष्ठानाचे अध्यक्ष शिरीष गोडबोले, उपाध्यक्ष तुकाराम चव्हाण, समन्वयक विजय कुलकर्णी, विजय जोशी, डॉ. सायरस पूनावाला शाळेचे मुख्याध्यापक प्रथमेश इनामदार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सुहास हिरेमठ यांनी दातृत्वाचे महत्त्व विशद करताना, समर्पक उदाहरणांसह दान देण्याच्या वृत्तीतून उत्तम माणूस म्हणून घडण्याची प्रक्रिया मांडली. उपस्थितांना समाजोपयोगी कार्य करण्यास प्रेरणा देत मार्गदर्शन केले. जनकल्याण प्रतिष्ठान आणि सरस्वती शैक्षणिक संकुलातील संबंधित सर्वांनीच ही वृत्ती जोपासत दातृत्वाचा आनंद या दान समर्पण कार्यक्रमात समाजातील गरजूंना साहाय्य करणाऱ्या संस्थांना वस्तुरूपी दान करत हा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे मोलाचे कार्य केले. ही काळजी गरज आहे. ही गरज ओळखणाऱ्या जनकल्याण प्रतिष्ठानाने सामाजिक बांधिलकी जपलेली असून, ते ही भावना भावी पिढीतही रुजवते, हे कौतुकास्पद आहे. गरजवंतांना वस्तुरूपी दान देण्यासाठी मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद, अनेकांचे दातृत्व, हीसुद्धा भारतमातेची सेवाच आहे. जनकल्याण प्रतिष्ठानला सेवाधर्माची जाणीव आहे. समाजामध्ये देणाऱ्यांची पूजा होते आणि त्यांच्या त्यागाची चर्चा होऊन त्यांच्या मार्गावर अनेकजण चालत असतात. फक्त ते प्रसिद्ध न होता आपले कार्य कायम ठेवतात, अशी उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर ठेवा. ते सर्व प्रकारच्या समर्पणासाठी तयार असतील अशी त्यांची तयारी करा, असे आवाहन हिरेमठ यांनी केले.
शिरीष गोडबोले म्हणाले, ‘‘जनकल्याण’ नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आलेली आहे. त्यासाठी राबवलेल्या उपक्रमांना समाजातून मोठा पाठिंबाही मिळत असल्याने हे कार्य सर्वांच्या साहाय्याने अखंड सुरू राहील.’