कराड शहरात जीबीएसचा एक रुग्ण सापडला असल्याच्या चर्चेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, याबाबतची माहिती घेण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर तालुका वैद्यकीय अधिकारीही संपर्कहीन असल्याने याबाबतची माहिती लपवण्यामागचा नेमका उद्देश काय? हा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. करोनानंतर जीबीएस (गुईलेन बॅरी सिंड्रोम) या संसर्गजन्य रोगाने डोके वर काढले आहे.
राज्यात अनेक जिल्ह्यांत याचे रुग्ण आढळले आहेत. याचे लोन सांगली जिल्ह्यातही पसरले आहेत. नुकतेच दोन दिवसांपूर्वी विटा शहरात जीबीएसचा एक रुग्ण आढळला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यानंतर आता विटा शहरानजीकच्या कराड शहरातही जीबीएसचा एक रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कराड तालुक्यातील एका गावातील बारा वर्षीय मुलीला जीबीएसची लागण झाली असून तिच्यावर दोन दिवसांपासून एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, एवढ्या गंभीर परिस्थितीची आणि जीबीएसची लागण झालेल्या रुग्णाची कराड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना कल्पनाच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जीबीएसची लागण झालेल्या रुग्णाबाबतची अधिकृत माहिती विचारण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता त्यांनी स्वतः आपणास याबाबत काहीही कल्पना नसल्याचे सांगितले.
दरम्यान, याबाबतची अधिकृत माहिती घेण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी श्री माळी यांच्याशी संपर्क साधला असता ते संपर्कहीन असल्याचे समोर आले. त्यांनी आपला भ्रमणध्वनी बंद करून ठेवल्याने जीबीएसचा रुग्ण सापडल्याची माहिती लपविण्याचा ‘प्रताप’ नेमका कशासाठी केला जात आहे? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी, पालकमंत्री याबाबत नेमकी काय कार्यवाही करणार हे पहावे लागेल.