नाल्यांच्या सफाईसाठी ५४० कोटींचा खर्च अपेक्षित

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून यंदाही नालेसफाई करण्यात येणार असून त्याकरीता पालिका प्रशासनाने शुक्रवारी निविदा मागवल्या. मोठे नाले, लहान नाले, भूमिगत गटारे, मिठी नदी यांच्यामधील गाळ काढण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. या सगळ्या कामांसाठी एकूण २६ विविध निविदा परिमंडळाप्रमाणे मागवण्यात आल्या आहेत. प्रथमच दोन वर्षांसाठी कंत्राटदार नेमण्याकरीता निविदा मागवण्यात आल्या आहेत. या कामांचा खर्च ५४० कोटी होणार आहे.

मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबू नये म्हणून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नदी व नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे केली जातात. संपूर्ण वर्षभरातील नालेसफाईपैकी ७५ टक्के गाळ हा पावसाळ्याआधी काढला जातो. तर १५ टक्के गाळ पावसाळ्यादरम्यान आणि १० टक्के पावसाळ्यानंतर काढला जातो. ही कामे दरवर्षी मार्च महिन्यात सुरू होतात. त्याकरीता डिसेंबर महिन्यात निविदा मागवल्या जातात. यंदा मात्र या निविदांना उशीर झाला असून पुढील दोन महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करून एप्रिल पासून नालेसफाईच्या कामांना सुरूवात करावी लागणार आहे. त्यामुळे यंदा ही कामे एप्रिल महिन्यात होणार का याबाबत शंका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *