धारावीत तरुणाची हत्या; तिघांना अटक

धारावी येथे आदित्य श्रीकांत नारायणकर (२६) याच्यावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी धारावी पोलिसांनी तिघांना अटक केली असून राकेश बाबू कुंचीकुरवे, सतीश बाबू कुंचीकुरवे, बाबू कुंचीकुरवे अशी या तिघांची नावे आहेत. सतीशविरोधात यापूर्वी धारावी पोलीस ठाण्यात मारामारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

धारावीतील संत ककैया मार्ग, शिवशक्ती नगर येथील गल्ली क्रमांक ८ मधील खोली क्रमांक ७७ समोर शनिवारी हा प्रकार घडला. आदित्य व कुंचीकुरर्वे कुटुंबिय याच परिसरात राहतात. पूर्वीच्या वादातून आरोपींनी शनिवारी रात्री ८ वाजता आदित्यसोबत भांडण केले. हा वाद विकोपाला गेला आणि आरोपींनी आदित्यला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्यात आदित्य गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. याप्रकरणानंतर परिसरातील नागरिकांनी आदित्यला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आदित्यच्या चेहऱ्यावर, गळ्यावर, छातीवर, हातावर व पोटावर चाकूचे वार करण्यात आले होते. त्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आदित्यची बहीण प्रिया सुनील मैत्री यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली असून ते पिता-पुत्र आहेत. हत्येत वापरण्यात आलेला चाकू पोलिसानी हस्तगत केला. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *