नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंनी स्थापन केलेल्या नाम संस्थेनं औरंगाबाद जिल्ह्यातील धोदंलगाव दत्तक घेतलं आहे. गांधी जंयतीनिमित्त घेण्यात आलेल्या ग्रामसभेत नाना आणि अनासपुरेंनी तशी घोषणा केली.
एरवी पैसे घेण्यासाठी आपण लोकांनी रांगा लावल्याचं पाहिल असेल, मात्र औरंगाबादमध्ये नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांना लोकांनी रांग लाऊन पैसे दिले. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या मदतीसाठी नाम फाउंडेशन नावाची संस्था उभा केली आहे. या संस्थेच्या खात्यात आतापर्यत 7 कोटी एवढा निधी जमा झाला आहे. जेव्हा एक वृद्ध व्यक्तीने नानाला 330 रूपये दिले त्यावेळी नानाला अक्षरश: भरून आलं.
सहा हजारांची लोकवस्ती असलेल्या गावाच्या विकासाची धुरा नाना आणि मकरंद यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. धोदंलगावच्या विकासासाठी कुणी बाहेरून येणार नाही. आपल्यालाच गावाचा विकास साधायचा आहे अशा शब्दात नाना आणि मकरंद यांनी गावकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला.
यावेळी नाम संस्थेला मदत करणाऱ्यांचे आभार मानण्याची संधी नानानं साधली. नाम संस्थेच्या खात्यात 7 कोटींची रक्कम जमा झाली असून आतापर्यंत 625 शेतकऱ्यांना थेट मदत पोहोचवण्यात आली आहे. नामला मिळणाऱ्या मदतीचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या देखील तेवढ्याच वेगाने वाढते आहे.

