घोडबंदर परिसरात रुंदीकरण केलेल्या रस्त्यांवर ठाण मांडणारे फेरिवाले, तिथे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांकडून होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी, उघड्यावर असलेल्या वीज वाहिन्या, चालण्यासाठी पदपथ नाहीत, विविध कार्यक्रमांमुळे मुलांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध होत नाहीत, कचरा उचलला जात नाही, अशा विविध समस्यांच्या तक्रारींचा पाढा मंगळवारी घोडबंदरवासियांनी पालिका प्रशासनापुढे मांडला. आम्हाला हक्काचे पुरेसे पाणी देण्यासाठी उपलब्ध नसते. मग, टँकरचालकांना पाणी कसे मिळते, असा प्रश्नही रहिवाशांनी पालिका प्रशासनाला विचारला. त्यावर पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देत त्यांना भेडसावणाऱ्या समस्या लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले.
नवे ठाणे म्हणून घोडबंदर परिसर ओळखला जातो. या भागात मोठमोठी गृहसंकुले उभी राहीली आहेत. आजही याठिकाणी गृहसंकुले उभारणीची कामे सुरू आहेत. वाढत्या नागरिकरणाबरोबरच येथील नागरिकांना विविध समस्या भेडसावत आहेत. त्यात प्रामुख्याने पाणी आणि वाहतूक कोंडीच्या समस्येचा समावेश असून त्याचबरोबर आता फेरिवाल्यांच्याही त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी मंगळवारी ठाणे महापालिका मुख्यालयात एक बैठक घेतली. या बैठकीला ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, जी. जी. गोदेपुरे, मनोज तायडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा आणि घोडबंदर भागातील गृहसंकुलांचे प्रतिनिधी राजेश अढांगळे, मेर्सी, विजय पांचाळ, रोशन माखिजा, विजय देसाई, डाॅ, तृप्ती आनंद, संतोष सिंग, निखिल ठोंबरे, प्रविण नाखवा यांच्यासह एकूण ४७ गृहसंकुलांच्या प्रतिनिधी उपस्थित होते. घोडबंदर भागात अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करून नुतनीकरण करण्यात आले आहे. परंतु या रस्त्यांवर आता फेरिवाले बसत आहेत. त्यांच्याकडे खरेदी करण्यासाठी येणारे नागरिक रस्त्यावर दुहेरी बेकायदा पार्किंग करत आहेत. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही गृहसंकुलांनी रस्ते रुंदीकरणासाठी आपली जागा दिली आहे. त्यांची वाहने रस्त्याकडेला उभी केली जातात. परंतु त्याव्यतिरिक्तही वाहने उभी राहत आहेत. अशी वाहने हटविण्यासाठी वाॅर्डन नेमले पाहिजेत. या वाॅर्डनचा पगार सोसायटी पैसे देण्यास तयार आहे, असे मुद्दे घोडबंदर भागातील रहिवासी मुकेश ठोंबरे यांनी मांडले.
