भूकंपाच्या धक्क्याने हरसूल हादरले, लेकरांसह गावकऱ्यांनी रात्र काढली जागून; सतत बसणाऱ्या हादऱ्यांनी धास्ती वाढली

नाशिक तालुक्यातील हरसूल भागात मंगळवारी रात्री २.२ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे हरसूल आणि परिसरातील ग्रामस्थांनी मंगळवारची रात्र जागून काढली.

गत चार दिवसांपासून जमिनीला हादरे बसण्यासह आवाज येत असल्याची चर्चा हरसूल भागात आहे. त्यातही दोन दिवसांपूर्वी पहाटे भूकंपसदृश हादरे बसले. त्यानंतर मंगळवारी पुन्हा सुमारास मोठा आवाज झाला आणि जमिनीला हादरे बसले. रात्रीची वेळ आणि हवेत असलेला गारठा यामुळे बहुतांश लोक घरात होते. अचानक मोठा आवाज झाल्याने ते घाबरले आणि घराबाहेर धाव घेत मोकळ्या जागेवर जमा झाले. या भूकंपाचे वृत्त व्हायरल झाल्याने गोंधळात भर पडली. शासकीय यंत्रणाही याबाबत गाफिल असल्याचे निदर्शनास आले. वास्तविक याबाबत तातडीने ‘मेरी’ अथवा अन्य संस्थांचा जाणकारांकडून माहिती घेऊन स्थानिक पातळीवर नागरिकांची भीती दूर होईल, असा संदेश देण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे घडले नाही. त्यामुळे हरसूल गाव आणि परिसरातील ग्रामस्थांना भयाच्या सावटाखाली रात्र जागून काढावी लागली. थंडीमुळे रुग्ण, वयोवृद्ध, बालकांना मोठी गैरसोय सहन करावी लागली.

…या उणिवा व्हाव्यात दूरत्र्यंबकेश्वर येथे तहसील कार्यालयात आपत्ती निवारण कक्ष नाही. केवळ पावसाळ्यात दरड कोसळते म्हणून काही दिवस ते स्थापन करण्यात येतात. भूकंप, वादळ अथवा बिगरमोसमी ढगफुटीसारख्या घटनेची शक्यता वाटल्यास कोणाकडे विचारणा करायची याची माहिती नागरिकांना उपलब्ध नाही. शासकीय यंत्रणांचे कर्मचारी व अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने मंगळवारी स्थानिकांना दिलासा मिळू शकला नाही. अखेर हा भूगर्भातील हालचालींचा परिणाम असून, घाबरण्याचे कारण नाही, असा निर्वाळा भूगर्भ शास्त्रज्ञांच्या हवाल्याने प्रशासनाकडून बुधवारी देण्यात आला. हरसूल भागातील ५८ गावांची लोकसंख्या एक लाखाच्या आसपास आहे. दुर्दैवी घटना घडल्यास तेथे मदतीसाठी वाघेरा, करंजाळी असे घाटरस्तेच आहेत. त्यामुळे येथे मोबाइल नेटवर्कसह कायमस्वरूपी बिनतारी संदेश यंत्रणा गरजेची बनल्याचे मंगळवार घटनेने स्पष्ट झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *