सव्वा महिन्याच्या बाळंतीण महिलेला घरात घुसून पोलिसांनी मारहाण केली आहे. नवीन गोध्रा घडवण्याचा कोणाचा प्रयत्न आहे का? पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला आहे. सरकारने सोमनाथच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत दिली पाहिजे. तसेच, त्याच्या कुटुंबातील एकास सरकारी नोकरीत घेतले पाहिजे. आज भडकवणारे अनेक जण येतील, लोकांनी सावध राहिले पाहिजे, असे आवाहनही वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, सोमनाथचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला आहे. सरकारने १ कोटी रुपये नुकसान भरपाई आणि घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी. जखमी लोकांना २५ लाख नुकसान भरपाई द्यावी. ही भरपाई पोलिसांकडून वसूल करावी. तरच पोलीस दलातील या अनियंत्रित पोलिसांवर नियंत्रण येईल. परभणीतील पोलीस निरीक्षक घोरबांड याचा इतिहास गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्याने समोरासमोर दोन लोकांचा एन्काऊंटर केला आहे.
