सीएनजी पंपावर गॅसचे ‘नोझल’ उडाल्याने कामगाराचा डोळा निकामी, धनकवडीतील घटना; पंप मालकासह व्यवस्थापकाविरुद्ध गु्न्हा

सीएनजी पंपावर गॅस भरत असताना अचानक नोझल उडल्याने कामगाराचा डावा डोळा निकामी झाल्याची घटना धनकवडी भागात घडली. नोझल उडाल्याने कामगाराच्या डाव्या डाेळ्यावर आदळले. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी सीएनजी पंप मालकासह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

या घटनेत हर्षद गणेश गेहलोत (वय २३, रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) याचा डोळा निकामी झाला आहे. गेहलोत याने याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सीएनजी पंप मालकासह व्यवस्थाापक धैर्यशील पानसरे, राहीत हरकुर्की यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास धनकवडीतील तीन हत्ती चौकातील एस स्क्वेअर सीएनजी पेट्रोल पंपावर ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडीतील तीन हत्ती चौकात एस स्क्वेअर हा सीएनजी पंप आहे. तेथे हर्षद गेहलोत हा गेल्या वर्षभरापासून काम करत आहे. रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तो एका गाडीमध्ये सीएनजी गॅस भरत होता. त्यावेळी गॅसचे नोझल उडून गेहलोत याच्या डाव्या डोळ्यावर आदळले. दुर्घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा डोळा निकामी झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. सीएनजी पंपाचे मालक, तसेच व्यवस्थापकाने सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने ही दुर्घटना घडली, असे गेहलोत याने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस कर्मचारी चव्हाण तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *