खरीप हंगामात निघालेल्या कांद्याच्या दरांत गेल्या चार दिवसांत मोठी घसरण झाली आहे. नाशिकमधील लासलगाव बाजारात सोमवारी कांद्याचे दर १० ते १२ रुपये किलोपर्यंत घसरले तर, मुंबईच्या एपीएमसीतही कांदा ३० रुपये किलोने विकला जात आहे. मात्र, किरकोळ बाजारांत अजूनही कांद्याचे दर ६० ते ८० रुपये इतके आहेत. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्याला विक्रीतून् नुकसान सोसावे लागत असताना सामान्य ग्राहकांनाही खरेदीसाठी खिसा जास्त हलका करावा लागत आहे.
आवक कमी असताना गेल्या महिन्यात कांद्याला सरासरी ४७०० रुपयांपर्यंत दर मिळाला होता. मात्र, सोमवारी लासलगाव बाजार समितीत किमान एक हजार ते कमाल ३८०० रुपये प्रति क्विंटल दर कांद्याला मिळाला. सोलापूर, अहिल्यानगर, पुणे भागांसह राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक राज्यातील कांदा स्थानिक बाजारात येऊ लागला आहे. दर स्थिरीकरण योजनेंतर्गत केद्र सरकारने खरेदी केलेला कांदा महानगरांमध्ये पुरवला जात आहे. यामुळे देशांतर्गत मागणी कमी झाल्याचे लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले.
