फटाक्यांवर बंदी आणा, सहा ते 14 महिने वयोगटातील बाळांची कोर्टात याचिका

फटाक्यांवर बंदी आणा, सहा ते 14 महिने वयोगटातील बाळांची कोर्टात याचिका

सर्वात प्रदुषित शहर ही दिल्ली शहराची ओळख मिटवण्याचा प्रयत्न दिल्लीकर हरतऱ्हेने करत आहेत. मात्र प्रौढांच्या लढ्याला यश येत नसल्यामुळे अखेर तीन लहानग्यांनी यात उडी घेतली आहे. अर्जुन गोपाल, आरव भंडारी आणि झोया राव भसीन या 6 ते 14 महिने वयोगटातील बालकांनी फटाक्यांवर बंदी आणण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे.

कायदेशीर पालकांच्या मार्गदर्शनात तिघांनी केलेल्या याचिकेत दिल्लीतील प्रदुषणाची घातक पातळी तातडीने आटोक्यात आणण्याची विनंती केली आहे. यात सणासुदीच्या काळात सर्व प्रकारच्या फटाक्यांवर पूर्णपणे बंदीची मागणी केली आहे. दिवाळीपूर्वीच फटाक्यांच्या विक्रीवर अंतरिम स्थगितीचे आदेश देण्याबाबतही याचिकेत उल्लेख आहे. कोर्टात जनहित याचिका दाखल करणारे हे चिमुरडे सर्वात तरुण याचिकाकर्ते ठरले आहेत.

गेल्या 2 वर्षांत दिल्ली जगातल्या सर्वात प्रदुषित शहरांच्या यादीत वरच्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे वर्षभरात वायू प्रदुषणामुळे देशभरात जवळपास 7 लाख जणांचा मृत्यू ओढावला आहे. युरोपियन नागरिकांच्या तुलनेत भारतीयांची फुफ्फुसं 30 टक्के कमकुवत झाल्यासं संशोधनात आढळलं आहे. शिवाय लहान मुलांचा शारीरिक विकास पुरेसा न झाल्यामुळे त्यांना प्रदुषणाचा जास्त फटका बसतो.

‘आम्ही वायू प्रदूषणाला बळी पडणाऱ्या दुर्बल घटकांपैकी असून आम्हाला अस्थमा, कफ, ब्राँकायटिस यासारखे विकार बळवण्याची तसेच नर्व्हस सिस्टमशी निगडीत अनेक आजार होण्याची शक्यता जास्त आहे’ असं याचिकेत म्हटलं आहे.

दिल्ली शहराचं सौंदर्य सण विचित्र पद्धतीने साजरे करण्याच्या पद्धतीमुळे बिघडत आहे. फटाके तर दिल्लीकरांना स्मशानाच्या दिशेने एक पाऊल पुढे नेण्यास हातभारच लावत आहेत, असंही याचिकेत म्हटलं आहे. भारतात वायू प्रदुषण हे मृत्यूला कारणीभूत ठरणारा पाचव्या क्रमाकांचा घटक आहे अशी अधिकृत माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *