पुणे रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक २वर बॉम्ब ठेवला असल्याचा फोन पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला करण्यात आला. सकाळी ९ वाजता अज्ञात व्यक्तीकडून फोन आल्याची माहिती आहे. फोन करणारा व्यक्ती पिंपरी चिंचवड भागातील रावेत येथील राहणारा असून त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाला (दि.८) सकाळी ९ वाजता अज्ञात व्यक्तीने फोन केला. पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २वर बॉम्ब ठेवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तातडीने प्लॅटफॉर्म क्रमांक २वर तपासणी केली. मात्र त्याठिकाणी तसे काही आढळून आले नाही.
फोन करणाऱ्या व्यक्तीची माहिती काढल्यानंतर तो पिंपरी-चिंचवड भागातील रावेत येथील राहणारा असल्याचे समजले. त्याला तातडीने पिंपरी चिंचवड पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने नशा करून खोडसाळपणे फोन केल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी- चिंचवड पोलिसांकडून संबंधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
