कुर्ला बस अपघातातील मृतांची संख्या सहा

कुर्ला परिसरात बेस्ट बसच्या भीषण अपघातातील जखमींपैकी आणखी दोघांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या सहावर पोहोचली आहे. भरधाव वेगात धावणाऱ्या बेस्टच्या बसने सोमवारी रात्री कुर्ला परिसरात अनेकांना धडक दिली होती. या अपघातामध्ये ४९ जण जखमी झाले असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

कुर्ला पश्चिम येथील महापालिकेच्या एल विभाग कार्यालयाजवळ सोमवारी रात्री १० च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. ही बस कुर्ला पश्चिम येथून अंधेरीला जात होती. यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर या बसने रस्त्यावरून जाणाऱ्या काही खासगी वाहनांसह रिक्षा आणि अनेक पादचाऱ्यांना धडक दिली. अखेर ही बस एका भिंतीवर आदळली. या अपघातात ४९ जण जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ सर्व जखमींना कुर्ला येथील महापालिकेच्या भाभा आणि इतर खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *