मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत, बायकोने लाटणं-भांड्याने बेदम मारलं, नवऱ्याची पँट खेचली, पुण्यातील प्रकार

घरात भिजवलेले (मोड आलेले) हरभरे पतीने खाल्ले नाहीत, या कारणावरुन पत्नीने पतीला मारहाण केल्याचा आरोप आहे. लाटणं आणि मिक्सरच्या भांड्याने बेदम मारहाण करण्यापर्यंत विवाहितेची मजल गेली. इतकंच नाही, तर पत्नीने करंगळीचा चावा घेऊन नख तोडल्याचा धक्कादायक प्रकार पुणे शहरातील सोमवार पेठ भागात घडला.

या प्रकरणी सोमवार पेठ येथील त्रिशुंड गणपती मंदिराजवळ राहणाऱ्या ४४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यावरुन त्याच्या चाळीस वर्षीय पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एक डिसेंबरला रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे.

काय ठरलं निमित्त?

तक्रारदाराने घरात मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत, या कारणावरून त्यांच्या पत्नीने शिवीगाळ करून लाटण्याने मारहाण केली. पत्नीने तक्रारदाराला लाटण्याने तळ हातावर, डोक्यात, पाठीवर मारले. तसेच, हाताच्या नखांनी तोंडावर, गालावर, डाव्या कानाच्या पाठीमागे पोटाला ओरखडले.

त्यावेळी तक्रारदाराने पत्नीच्या हातातील लाटणे हिसकावून घेतले. त्यामुळे चिडलेल्या पत्नीने मिक्सरचे भांडे घेऊन दोन वेळा तक्रारदाराच्या डोक्यात मारले. त्यानंतर पत्नीने तक्रारदाराची पॅंट खाली ओढल्याने तक्रारदार खाली बसले.

पत्नी मारहाण करीत असताना स्वरक्षणासाठी तक्रारदाराने दोन्ही हात वर करून डोके झाकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तक्रारदाराच्या पत्नीने हाताच्या करंगळीला चावून नख तोडले. या घटनेनंतर घाबरलेल्या तक्रारदाराने पोलिसात धाव घेत तक्रार दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *