मिरा रोड मधून मध्यवर्ती गुन्हे शाखेने पन्नास लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी गुजरात मधील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या नोटा कुठे छापल्या आणि कुठे वितरित केल्या जाणार होत्या, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. काळ्या पैशांच्या देवाण-घेवाणीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. शनिवारी काशिमिरा येथे एक तरुण बनावट नोटा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी डॉन बॉस्को शाळेजवळ असलेल्या मुन्शी कंपाउंड येथे सापळा लावून आर्यन जाबूचा (१९) या तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या बॅगेत ५३ नोटांची बंडले आढळली. त्या एकूण ५१ लाख ७१ हजारांच्या नोटा आढळून आल्या.
