मध्यस्थाच्या मदतीने या जोडप्याने १२ नोव्हेंबर रोजी मूल नोटरीच्या माध्यमातून दत्तक करार करत आंध्रप्रदेशातील जोडप्याला सुपूर्द केले. पण हा करार बेकायदा असल्याचे पोलीसांनी म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणात काही आर्थिक व्यवहार झाला होता की नाही? याबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत, परंतु दोन्ही जोडप्यांनी मात्र कुठलाही आर्थिक व्यवहार झाल्याचे नाकारले आहे.
असा झाला उलगडा
स्थानिक अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांनी हा प्रकार रायगडा येथील जिल्हा बाल संरक्षण युनिटच्या अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर हा प्रकर उजेडात आला. त्यानंतर बाल संरक्षण समितीने मूल ताब्यात घेतले आहे. बाल संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, “अशा प्रकारे मुलाचा ताबा दत्तक करार करून इतर कोणाकडे देणे हे बेकायदा आहे. सध्या मूल हे आमच्या ताब्यात आहे”.
चौकशीदरम्यान आंध्रप्रदेशमधील जोडप्याने मान्य केले की त्यांना मुल दत्तक घेण्यासंबंधी नियमांबद्दल माहिती नव्हती. तर दुसरीकडे २००० रुपये महिना पगारावर, एका स्थानिक वाहतूक कंपनीमध्ये हेल्पर म्हणून काम करणाऱ्या बाळाच्या पित्याने सांगीतलं की, गरिबीमुळे तो आणि त्याची पत्नी नवजात बाळाचा सांभाळ करू शकत नव्हते, त्यामुळे त्यांनी नवजात मूल दुसर्याला सोपवण्याचा निर्णय घेतला.
ओडिशाच्या बालंगीर जिल्ह्यातील खापरखोल परिसरात मंगळवार अशीच एक घटना समोर आली होती, येथे एका जोडप्याने गरिबीमुळे सांभाळ करू शकत नसल्याने नवजात मुलीला कथितपणे एका अनोळखी व्यक्तींकडे सुपूर्द केले. या प्रकरणी बालंगीर येथील लाथोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.