मुंबईच्या काही भागांमध्ये निरुत्साह, मुस्लीमबहुल भागात तुलनेने अधिक मतदान

लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांची संख्या वाढविल्याने शहर व उपनगरातील काही भागांमध्ये मतदानासाठी मोठ्या रांगा लागण्याचे प्रमाण तुलनेने कमी होते. तर शहरातील काही भागांमध्ये मतदानासाठी निरुत्साहाचे वातावरण होते. आग्रीपाडा, नागपाडा, चांदिवली, जोगेश्वरी आदी ठिकाणी मुस्लिमबहुल विभागांमध्ये मात्र मतदानाचा जोर दिसून येत होता.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी शहर व उपनगरात मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या आणि मतदानाचा वेगही खूप कमी होता, अशा तक्रारी झाल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी एका केंद्रावर किमान दीड हजार मतदार होते. यंदा मात्र एक हजार ते बाराशेपर्यंत मतदार एका केंद्रावर होते. सकाळपासून ११ वाजेपर्यंत तर अनेक मतदान केंद्रांवर मतदानाचे प्रमाण तुलनेने कमी होते. मतदारांची ये-जा सुरु असली तरी मोठ्या रांगा नव्हत्या. आयोगाने आदेश दिल्याने बहुतांश केंद्रांवर मतदारांना बसण्यासाठी खुर्च्या व बाकड्यांची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र मतदारांच्या रांगा तुरळकच असल्याने या खुर्च्या रिकाम्याच होत्या.

चांदिवलीतील दुर्गादेवी हायस्कूलमधील केंद्रात तर लहान मुलांसाठी हिरकणी कक्षाचीही उभारणी करण्यात आली होती. पण या केंद्रासह अनेक ठिकाणी मतदारांना केंद्राच्या आवारात शिरतानाच मोबाईल बंद करण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात येत होत्या. मतदान कक्षात मोबाईलच्या वापरास बंदी असताना आवारात शिरतानाच ते बंद करण्यास पोलिस सांगत असल्याने वादावादीचे प्रकार होत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *