चिंचवड, भोसरीत उत्साह, तर पिंपरीत निरुत्साह

शहरातील चिंचवड आणि भाेसरी विधानसभा मतदारसंघात मतदारांनी उत्स्फूर्तपणे रांगा लावून मतदानाचा हक्क बजाविला, तर पिंपरी विधानसभा मतदारसंघात मतदारांचा निरुत्साह दिसून आला. मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू हाेती. मतदारयादीत चुकीची नावे असल्याच्या तक्रारी, मतदान केंद्रामध्ये माेबाइल घेऊन जाण्यावरून वादावादी, सहायता कक्षाकडून असहकार, मतदान स्थलांतर, नाव वगळणे, पैसेवाटपाचा आराेप अशा वातावरणात शहरातील तिन्ही मतदारसंघांतील मतदान बुधवारी पार पडले.

पिंपरी, भाेसरी आणि मावळमध्ये दुरंगी, तर चिंचवडमध्ये तिरंगी लढत हाेत आहे. पिंपरीत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अण्णा बनसाेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या सुलक्षणा शिलंवत-धर यांच्यासह १५ उमेदवार, चिंचवडमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे राहुल कलाटे, भाजपचे शंकर जगताप आणि अपक्ष भाऊसाहेब भाेईर यांच्यासह २१, भाेसरीत भाजपचे महेश लांडगे, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अजित गव्हाणे यांच्यासह ११, तर मावळमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे सुनील शेळके आणि अपक्ष बापू भेगडे यांच्यासह सहा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *