नागरिकांना चालण्यासाठी बनलेल्या पदपथांवर अतिक्रमणे वाढत चालली आहेत. शहराच्या अनेक भागात फेरीवाले, दुकानदार व उपाहारगृहांनी पदपथ अडवून ठेवल्यामुळे नागरिकांना चालणेही मुश्कील झाले आहे.
त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचे निर्देश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये सर्व विभागांमधील सर्व फुटपाथवर पसारा मांडलेल्या दुकानांचा सव्र्हे करून त्यांनी अडवलेला पदपथ मोकळा करण्यात येणार आहे.
आयुक्तपदी निवड झाल्यानंतर अजोय मेहता यांनी पदपथ हे नागरिकांना चालण्यासाठी मोकळे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पदपथ अडवणा-या फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली जात होती.
मात्र पुन्हा २४ विभागांमधील पदपथांवरील अतिक्रमणे हटवण्याची विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश मेहता यांनी मंगळवारी सर्व विभागांच्या सहायक आयुक्तांना दिले. सर्व विभागांच्या आयुक्तांनी आपल्या विभागातील पदपथांचे दोन दिवसांत सर्वेक्षण करावे.
यासाठी त्यांनी विभाग स्तरावर पाहणी पथके तयार करण्यास सांगितले आहे. दुकाने, उपाहारगृहे यांच्यासह इतरांकडून पदपथावर अतिक्रमण झाल्यास त्यांची छायाचित्रे घेण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले. त्यानंतर महापालिकेच्या नियमानुसार पदपथ अडवणा-या दुकाने व उपाहारगृहांविरोधात कारवाई करण्यात यावी.
पदपथावरील अतिक्रमणे हटवताना दुकाने व उपाहारगृहे यांच्याकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणे हटविण्यात प्रथम प्राधान्य देण्यात यावे,असे आयुक्तांनी म्हटले आहे.
यासर्व कारवाईचा अहवाल उपायुक्त (अतिक्रमण निर्मूलन) यांच्या माध्यमातून सर्व विभाग कार्यालयाच्या सहायक आयुक्तांनी आयुक्तांच्या कार्यालयाकडे पाठवावा, अशा सूचना केल्या आहेत.

