काही काळ विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात तयार झालेली कमी दाबाची प्रणाली पुढील 2-3 दिवसांत आणखी तीव्र होऊन वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा इशारा आहे.
पुढील चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात, आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश या भागांमध्ये हवामान खात्याने अलर्ट दिला आहे.
मुंबईसह उपनगरातमध्ये पुढील दोन ते तीन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहू शकते. त्याचबरोबर आज सायंकाळी देखील गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. तसेच कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगलीसह सोलापुरातील काही भागांमध्ये आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परिसरात आकाश ढगाळ राहणार आहे. तर अधून मधून पावसाच्या सरी देखील पडण्याची शक्यता आहे. पुण्यातील घाट भागात देखील हलका आणि मध्यम स्वरुपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
