अंधेरीत उघड्या नाल्यात पडून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू

मुसळधार पावसाने बुधवारी (२५ सप्टेंबर) महामुंबईला झोडपून काढलं. दिवसभर शहरांतील अनेक भाग आणि उपनगरांत कोसळणाऱ्या पावसात तग धरून असलेली मुंबई सायंकाळी मात्र पुरती कोलमडून गेली. सायंकाळी शहरातील अनेक भागांत २०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरांतील रेल्वे स्थानकांवर साचलेल्या पाण्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सखल भागांत साचलेल्या पाण्यामुळे रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली होती. रात्री उशीरापर्यंत गाड्या बंद असल्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकांवरच मुक्काम करावा लागला. अशातच पावसामुळे एक दुर्दैवी घटना घडली आहे. अंधेरी भागात एका महिलेचा नाल्यात पडून मृत्यू झाला आहे.

अंधेरीच्या एमआयडीसी भागात एका ४५ वर्षीय महिलेचा उघड्या नाल्यात पडून मृत्यू झाला आहे. या भागात पाणी साचलं होतं. त्यामुळे नाला व रस्ता दिसत नव्हता. तसेच नाल्यावर झाकणही नव्हतं. त्यामुळे ही महिला नाल्यात पडली व काही अंतरावर वाहून गेली. नाल्यातील पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. दरम्यान, नाल्यावर झाकण का नव्हतं? असा प्रश्न संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे आणि मुंबई महापालिकेला धारेवर धरलं आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की अंधेरी येथील एमआयडीसी भागात विमल गायकवाड ही ४५ वर्षीय महिला उघड्या नाल्यात बुडाली. अग्निशमन दलाने महिलेला नाल्यातून बाहेर काढलं व कूपर रुग्णालयात नेलं. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *