ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी देयकांच्या थकबाकीदारांविरोधात प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून यामध्ये थकबाकीदारांच्या आतापर्यंत ६११ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. याशिवाय, ३० मोटर पंप जप्त करण्यात आले आहेत. या पाणी देयक वसुली अभियानात आतापर्यंत सुमारे ३३ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. या कारवाईमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.
ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध विभागांना कर वसुलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात येते. अशाचप्रकारे पाणी पुरवठा विभागाला पाणी देयक वसुलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आलेले आहे. ठाणे महापालिकेची पाणी देयकाची रक्कम सुमारे २२४ कोटी रुपयांच्या घरात आहेत. त्यापैकी, ७६ कोटी रुपये ही थकबाकी आहे तर, १४८ कोटी रुपये ही चालू वर्षाच्या देयकांची रक्कम आहे. या देयकांच्या वसुलीवर पालिका प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले असून त्यासाठी थकबाकीदारांविरोधात कारवाईचा बडगा उगारून नळजोडण्या खंडीत करण्याची कारवाई सुरू केली आहे. या संदर्भात ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आदेश दिले आहेत. तसेच अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी देयकांच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून पाणी देयक वसुली अभियान सुरू करण्यास सांगितले होते. त्यानुसार, पाणी देयकाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडीत करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर खोलीला टाळे लावण्यात येत आहे. तसेच, पाणी देयकाचा भरणा करण्याऐवजी खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा जोडून घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचीही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.
