‘या’ राज्यात ६९ हजार सहायक शिक्षकांची नव्याने भरती? नेमके प्रकरण काय?

अलाहाबाद उच्च न्यायालयाने १३ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेश सरकारला २०१९ मध्ये सहायक शिक्षक भरती परीक्षा (एटीआरई)द्वारे निवडलेल्या ६९ हजार सहायक शिक्षकांची सुधारित यादी तयार करण्याचे निर्देश दिले. अनेक याचिकादारांनी या भरती प्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिले होते. उमेदवारांनी असा आरोप केला होता की, आरक्षित श्रेणीतील लोकांची कायद्यात दिलेल्या तरतुदींनुसार निवड केली गेली नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाने असेही म्हटले की, नियुक्त्यांमध्ये आरक्षण लागू करताना झालेल्या अनियमिततेच्या बाबी सरकारने सुधारायला हव्यात. या वादाची सुरुवात केव्हा झाली? नेमके हे प्रकरण काय? याविषयी जाणून घेऊ…

सहायक शिक्षक भरती परीक्षा

५ डिसेंबर २०१८ रोजी उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील शिक्षण विभागात ६९ हजार सहायक शिक्षकांची भरती करण्यासाठी एक जाहिरात जारी केली होती. सहायक शिक्षक भरती परीक्षा ५ जानेवारी २०१९ रोजी आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या ४.३१ लाख उमेदवारांपैकी ४.१० लाख उमेदवार परीक्षेला बसले होते. परीक्षेचा निकाल १२ मे २०२० रोजी घोषित करण्यात आला. या परीक्षेत १.४६ लाख उमेदवार पात्र ठरले होते. अनारक्षित किंवा सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी ६७.११ टक्के, इतर मागासवर्गीय (ओबीसी) उमेदवारांसाठी ६६.७३ टक्के व अनुसूचित जाती (एससी) उमेदवारांसाठी ६१.०१ टक्के कट ऑफ निश्चित करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *