सर्पदंशानंतर वेळीच उपचार न झाल्याने पाच वर्षांच्या मुलीला प्राण गमवावे लागले, तर याच सापाने दंश केलेला तिचा नऊ वर्षांचा भाऊ नागपुरात मेडिकलमध्ये गंभीर स्थितीत आहे. राणी व राज अशी या भावंडांची नावे आहेत.
काय घडलं?
छिंदवाड्याजवळ धानोरा येथे हे कुटुंब राहते. या मुलांना वडील नाहीत. त्यामुळे शेतमजुरी करणारी आई व ही दोन मुले राहतात. शुक्रवारी रात्री दोन्ही भावंडे आईसोबत जमिनीवर झोपली असताना रात्री ११ वाजताच्या सुमारास राणीच्या कानाला काहीतरी चावले. ती उठून बसली व तिने आईला सांगितले. मात्र, डास किंवा मुंगी असेल असे समजून त्या दोघीही पुन्हा झोपल्या. त्यानंतर रात्री २.३०च्या सुमारास राजच्या कानालाही दंश झाला. त्यामुळे राजने कानाकडे हात नेला व त्याच्या हातात सापच आला. त्याला पकडून ठेवून तो ओरडायला लागला. त्यामुळे आई उठली. पाहते तर मुलाच्या हातात साप होता. त्यांनी तो साप तसाच घराबाहेर फेकून दिला. काही वेळापूर्वीच राणीच्याही कानाला काहीतरी चावले होते, हे आठवून आईने तिला उठविले असता तिला श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे लक्षात आले. त्यावेळी ही महिला दोन्ही मुलांना घेऊन जवळच राहणाऱ्या नातेवाइकांकडे गेली. तेथून ते एका जडीबुटी देणाऱ्याकडे गेले. त्याने उपचार करून पाहिला. मात्र, जवळपास दोन तासांनी त्याने या मुलांना दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ते छिंदवाड्याच्या दिशेने निघाले. मात्र, तेथील दवाखान्यात पोहोचण्यापूर्वी वाटेतच राणीचा मृत्यू झाला. राजवर दवाखान्यात उपचार करण्यात आल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्याला नागपूरला मेडिकलमध्ये हलविण्यास सांगितले. त्यानुसार शनिवारी सकाळी त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. येथे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.
