पावसाळा सुरू झाल्यावर जून महिन्याच्या मध्यानंतर पाण्याची स्थिती बदलेल अशी अपेक्षा सिडको मंडळाच्या अधिकाऱ्यांना होती; परंतु धरणातील जलसाठा अजूनही निम्मासुद्धा भरलेला नाही. हेटवणे धरणातून सिडको पाण्याचा उपसा करून खारघर, उलवे, द्रोणागिरी या परिसरांना पाणीपुरवठा करते. जुलै महिन्यातही पाणीसाठा धरणात कमी असल्याने २० टक्के पाणीकपात सिडकोने लागू केली. त्यामुळे पाण्याच्या दुर्भिक्षाचा सामना खारघरसह द्रोणागिरी व उलवे वसाहतींमधील नागरिकांना करावा लागत आहे.
सध्या रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे काम असल्यावरच बाहेर पडण्याचा सल्ला हवामान विभागाकडून नागरिकांना दिला असला, तरी पिण्याचे पाणी घरातील नळांना येत नसल्याने खारघरवासीयांवर पिण्याच्या पाण्याचा बाटला दुकानातून चढ्या भावाने खरेदी करण्याची वेळ आली आहे.
