ठाणे : ऐन पावसाळ्यात ठाणेकरांपुढे कचरा समस्या, वाहनांसह प्रकल्प बंद पडण्याबरोबरच कोंडीमुळे नियोजन बिघडल्याचा प्रशासनाचा दावा

मुसळधार पावसामुळे गेल्या आठवड्यात ठाणेकरांना पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करावा लागला असतानाच, त्यापाठोपाठ आता शहरातील कचरा उचलला जात नसल्यामुळे अनेक गृहसंकुलांबाहेरील पिपांमध्ये कचरा ढिग लागत आहेत. ऐन पावसाळ्यात निर्माण झालेल्या कचरा समस्येमुळे रोगराई पसरण्याची भिती व्यक्त होत आहे. पालिकेच्या कचराभुमीमध्ये कचरा साठवणुकीसाठी पुरेशी जागा नसल्यामुळेच ही समस्या निर्माण झाल्याचा आरोप माजी लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे. तर, पावसाळ्यात कचरा प्रकल्पातील यंत्रणेत निर्माण होणारे बिघाड, कचरा वाहतूक वाहने बंद पडणे आणि वाहतूक कोंडीमुळे कचरा वाहतूक फेऱ्या कमी होणे, या कारणास्तव घनकचरा नियोजनाचे चक्र बिघडल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज १ हजार मेट्रीक टनच्या आसपास कचरा निर्माण होतो. त्यात ६० टक्के ओला तर, ४० टक्के सुका कचरा असतो. महापालिकेची स्वत:ची कचराभुमी नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शहरात कचरा समस्या निर्माण होत आहे. त्यावर मात करण्यासाठी पालिकेने डायघर येथे घनकचरा प्रकल्पाची उभारणी केली आहे. परंतु हा प्रकल्प अद्याप पुर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेला नाही. तसेच वागळे इस्टेट येथील सीपी तलाव परिसरात पालिकेने घनकचरा हस्तांतरण स्थानकाची उभारणी केलेली आहे. असे असतानाही गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरासह घोडबंदर भागातील गृहसंकुलांबाहेरील पिंपामध्ये कचरा ढिग साचत आहेत. घोडबंदर रोडवरील ब्रह्रांड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत भागात दररोज सकाळी कचरा उचलण्यासाठी येणाऱ्या घंटागाड्या बंद झाल्या आहेत. परिणामी प्रत्येक संकुलाच्या बाहेर पिंपामध्ये कचरा साचला आहे. त्यातील कचरा रस्त्यावर पसरत आहे. पावसामुळे ओला कचरा कुजून दुर्गंधीबरोबरच रोगराई पसरण्याची भिती आहे. असेच काहीसे चित्र शहरातही आहे. या संदर्भात भाजपचे माजी नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे तक्रार केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *