कोकणात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. मुसळधार पावसात रत्नागिरी जिल्ह्यात भीषण दुर्घटना घडली आहे. चिपळूण येथील सुप्रसिद्ध डीबीजे महाविद्यालयाची संरक्षक भिंत कोसळली. या भिंतीच्या खाली गाडला गेल्यामुळे कॉलेजमधील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सिद्धांत घाणेकर असे मयत तरुणाचे नाव आहे.
रत्नागिरीतील चिपळूण शहरात असलेल्या डीबीजे कॉलेज या नावाने प्रसिद्ध असलेल्या डॉ. दातार विज्ञान, डॉ. बेहेरे कला, श्री पिलुकाका जोशी वाणिज्य महाविद्यालयात शुक्रवारी ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
सिद्धांत घाणेकर हा दापोली देगाव मधील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. या विद्यार्थ्याने गेल्या वर्षी डीबीजे महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स या विषयासाठी ऍडमिशन घेतली होती.
रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत असलेला सिद्धांत हा खेड तालुक्यातील लोटे येथे आपल्या मामाकडे राहत होता. येथून चिपळूण येथे तो महाविद्यालयात शिक्षण घेत होता, मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतला नाही. त्याची शोधाशोध सुरू होती. अखेर त्याच्या मोबाईलचे लोकेशन तपासण्यात आलं. हे चिपळूण लोकेशन डीबीजे महाविद्यालयात परिसरात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली त्यानंतर युद्धपातळीवर पडलेली भिंत बाजूला करण्यात आली. ढिगाऱ्याखाली त्याचा दुर्दैवीरित्या मृतदेह आढळून आला. या सगळ्या धक्कादायक दुर्दैवी घटनेने कुटुंबावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हा विद्यार्थी मूळचा दापोली तालुक्यातील देगाव परिसरातील आहे. चिपळूण तालुक्याचे पोलीस अधीक्षक रवींद्र शिंदे व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाल आहे. या विद्यार्थ्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हॉस्पिटल पाठवण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे चिऱ्याची भिंत कोसळल्याने या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे
