डान्स रिअॅलिटी शोमध्ये भाग घेण्यासाठी प्रेमी युगुलाकडून मुलाची हत्या

डान्स रिअॅलिटी शोमध्ये भाग घेण्यासाठी प्रेमी युगुलाकडून मुलाची हत्या

प्रसिद्धीच्या हव्यासातून एखादी व्यक्ती कुठल्या थराला जाईल याचा अंदाज बांधणं हल्ली कठीण झालं आहे. टीव्हीवरील एका सुप्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेण्यासाठी एका प्रेमी युगुलाने 13 वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

विशेष म्हणजे हत्या करणारे दोन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. डान्स रिअॅलिटी शोच्या सुरुवातीच्या दोन फेऱ्या त्यांनी पार केल्या होत्या. मात्र ते तिसरी फेरी पार करण्यात अपयशी ठरले. यावेळी एका व्यक्तीने 60 हजार रुपयांच्या मोबदल्यात त्यांना थेट पुढच्या फेरीत प्रवेश देण्याचं आमीष दाखवलं.

प्रसिद्धीच्या हव्यासातून दोघांनी उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या 13 वर्षांच्या मुलाच्या हत्येचा कट रचला. स्वप्निश गुप्ताची बेल्टने गळा आवळून हत्या केली आणि त्याचा मृतदेह डोंगराळ भागात फेकून दिला. त्यानंतर स्वप्निशच्या कुटुंबियांना फोन करुन त्याच्या सुटकेसाठी 60 हजार रुपयांची मागणी केली. घाबरलेल्या गुप्ता कुटुंबियांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली.

आरोपींनी गुप्ता कुटुंबियांना फरिदाबादजवळ स्मशानघाटावर पैसे ठेवून जाण्यास सांगितलं. त्यावेळी साध्या वेशातील पोलिसांनी पैसे उचलण्यासाठी आलेल्या आरोपींची धरपकड केली आणि सत्य बाहेर आलं. अल्पवयीन प्रेमी युगुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *