धानोरा तालुक्यातील पेंढरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत रुपिनगट्टा या गावामध्ये गुरूवारी दुपारी बारश्यानिमित्त आयोजित सामुहिक भोजनावेळी कार्यक्रमात ३० लोकांना अन्नातून विषबाधा झाली. त्यापैकी एका बालकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. उर्वरित सर्व बाधितांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे आरोग्य प्रशासनाकडून कळविण्यात आले. दरम्यान या घटनेत विषबाधा नेमकी कशी झाले हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.
या कार्यक्रमामध्ये सुमारे ७० लोक उपस्थित होते. भोजनावळीच्या पहिल्या पंगतीमध्ये बसलेल्या सुमारे ३० लोकांना उलटी, मळमळ अशी लक्षणे दिसून आल्यानंतर जेवण थांबविण्यात आले. प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र पेंढरी येथे उपचार करुन पुढील उपचाराकरीता रुग्णवाहिकेने सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ६ रुग्णांना सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे आणण्यात आले.
