महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी १९५५-५६ मध्ये सुरू केली. त्यानंतर एवढ्या वर्षांनंतरही राज्यात मोठ्या प्रमाणात कुष्ठरुग्ण आढळून येत आहेत. राज्यात एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या वर्षात २० हजार कुष्ठरुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कुष्ठरोग निर्मूलनाच्या उद्दिष्टापासून राज्य अजूनही खूप दूर असल्याचे चित्र समोर आले आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या तीन वर्षांचा विचार करता राज्यातील कुष्ठरुग्णांची संख्या वाढत आहे. कुष्ठरोगाचे राज्यात २०२१-२२ मध्ये १४ हजार ५२० रुग्ण, २०२२-२३ मध्ये १९ हजार ८६० रुग्ण आणि २०२३-२४ मध्ये २० हजार १ रुग्ण आढळले. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात २०१८-१९ पासून कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबविली जात आहे. त्यात सर्व ग्रामीण भाग आणि अतिजोखमीचा ३० टक्के शहरी भाग यात तपासणी मोहीम राबविली जाते. या मोहिमेत राज्यभरात गेल्या वर्षी २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत ६ हजार ७४४ कुष्ठरुग्ण आढळून आले.
