लाकूड जाळून त्यावर चालणाऱ्या मोजक्या बेकऱ्या मुंबईत असल्या तरी त्यांच्यामुळे होणारे प्रदूषण लक्षात घेता या बेकऱ्या बंद करण्यासाठी पालिकेच्या पर्यावरण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. लाकडावरील या बेकऱ्यांना इंधनाची पर्यायी व्यवस्था देता येईल का, त्याकरिता त्यांना काही मदत करता येईल का या दृष्टीने सध्या विचार सुरू आहे.
विजेवर चालणाऱ्या किंवा गॅसवर चालणाऱ्या बेकरीत रुपांतर करता येईल का, या दृष्टीने पर्यावरण विभाग सध्या अभ्यास करीत आहे. गेल्या वर्षी पालिकेने प्रदूषण नियंत्रणात ठेवण्याकरिता कृती आराखडा तयार केला होता. त्यात शहरातील बांधकामाविषयी नियमावली समाविष्ट करण्यात आली होती. त्याचबरोबर बेकरी उद्योग, स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार, उपाहारगृहातील तंदूर भट्टीसाठी लाकूड जाळण्याऐवजी विजेचा वापर करावा, अशा सूचना करण्यात आल्या होत्या.
