मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षापासून लैंगिक शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. तूर्तास नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना सेक्स एज्युकेशन देण्यात येणार आहे.
शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शिक्षण समितीत यासंदर्भात ठरावाची सुचना मांडली होती. त्या सुचनेला प्रशासनाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
सुरुवातीला नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण दिलं जाणार असून त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. किशोरवयीन मुला-मुलींचे लैंगिक शोषण कसे होऊ शकतं आणि ते कशाप्रकारे टाळता येईल, याचे धडेही दिले जातील. जर असा प्रकार घडलाच तर मदतीसाठी कुठे संपर्क करायचा, हेही सांगितले जाईल.
किशोरवयात मुलांमुलींमध्ये होणारे शारीरिक आणि मानसिक बदल, मासिक पाळी, प्रसुती, प्रजनन संस्था आणि कुटुंबनियोजन या विषयांवर मुलांना सखोल माहिती दिली जाणार आहे.
