त्र्यंबकेश्वरमध्ये तिसरे शाहीस्नान

त्र्यंबकेश्वरमध्ये तिसरे शाहीस्नान

एकादशी व प्रदोषच्या मुहूर्तावर त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थावर कुंभपर्वातील तिसरे आणि अखेरचे शाहीस्नान मोठ्या उत्साहात सुरू आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये पहाटे निघालेल्या शाही मिरवणूकीदरम्यान शाही मार्गावर भाविकांनी रांगोळ्यांच्या पायघड्यानी साधू-संतांचे स्वागत केले. मध्यरात्री मानसरोवरातील पाणी कुशावर्ताच्या कुंडात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समर्पित करण्यात आल्यानंतर शुक्रवारी पहाटे शंकराचार्यांनी प्रथम शाहीस्नान केले आणि पर्वणीला सुरुवात झाली.

यानंतर आठही आखाड्यांचे शाहीस्नान सकाळी साडेआठच्या सुमारास पूर्ण झाले. यावेळी शैवपंथीय साधू-महंत आणि लाखो भाविकांनी शाही स्नानाची पर्वणी साधली.

नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्याच्या तिस-या आणि शेवटच्या शाहीस्नानाला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली आहे. कुंभमेळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जवळपास सात हजार पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचा बंदोबस्त तैनात केला आहे.

यावेळी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थित कैलास मानसरोवरचे तीर्थ कुशावर्त गोदावरीत समर्पित करण्यात आले. यामुळे दोन संस्कृतींचे मिलन झाले असून हा सिंहस्थ आता आंतरराष्ट्रीय कुंभ झाल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ऑब्झर्व्हर रिसर्च फांऊडेशन आणि चीन सरकारच्या मदतीने हा उपक्रम राबवण्यात आला. यामुळे भारत व चीनचे संबंध सुधारण्यास मदत होईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन आणि चीनी दुतावासातील महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. मुंबईतील चिनी दुतावास आणि राज्य सरकारच्या वतीने या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निघून गेल्यावर राज्यमंत्री दादा भूसे यांचे आखाड्यात आगमन झाल्याने शिवसेनेने येथेही स्वतंत्र आखाडा तयार केल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *