ल्या १५ दिवसांत तूरडाळ आणि मूगडाळ अनुक्रमे किमान १५ आणि दहा रुपयांनी महागली आहे. दरवाढीमुळे केंद्र सरकारने सर्व विक्रेते, गोदाम मालक, मिल मालकांना तूरडाळीचा साठा घोषित करण्याची सूचना केली. त्यामुळे विक्रेत्यांना लवकरच साठामर्यादा लागू होण्याची शक्यता असल्याचे अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे म्हणणे आहे.
तूरडाळींचे नवीन पीक नोव्हेंबरदरम्यान बाजारात येते. सर्वाधिक उत्पादन विदर्भातील अकोला, यवतमाळ आणि मराठवाडा क्षेत्रातील लातूरमध्ये घेतले जाते. यंदा देशभरात सरासरीपेक्षा सात टक्के अधिक पीक आले. मात्र, त्याचवेळी मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळेच दरात वाढ सुरू झाली आहे.
मुंबईत मार्च महिन्यापर्यंत तूरडाळीचा घाऊक दर १२० ते १४० रुपये प्रतिकिलो होता. तो आता १४० ते १७० रुपये झाला आहे. यामुळे किरकोळ दर १४० रुपयांवरून १७० ते १९० रुपये प्रतिकिलोच्या घरात गेला आहे. तर घाऊक बाजारात ९० ते १०० रुपये असलेली मूगडाळ आता ११० ते १२० रुपये प्रतिकिलोवर गेली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात मूगडाळीचा दर १४० रुपये प्रति किलोच्या घरात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साठा घोषित करण्याची सूचना केली आहे.
