सुट्टीसाठी सर्वोत्तम ठिकाण कोणतं असा प्रश्न विचारला असता अनेकांचीच पसंती काही निवडक ठिकाणांना असते. त्यातलंच एक ठिकाण म्हणजे गोवा (Goa). निळाशार समुद्रकिनारा, पायांखालून निसटणारी वाळू, किनाऱ्यापाशी येणारे आणि क्षणात दिसेनासे होणारे शंखशिंपले अशा वातावरणानं भारलेल्या या गोव्याच्या किनाऱ्यावर निवांत क्षण व्यतीत करण्यासाठी अनेकजण येतात. पर्यटकांचा हा ओघ आता आणखी वाढत आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे मुंबई-गोवा (मडगाव) वंदे भारत एक्स्प्रेस.
किमान वेळात गोव्यात पोहोचवणाऱ्या या रेल्वेगाडीमुळं मोठं अंतर कमीत कमी वेळात ओलांडणं अगदी सहज शक्य झालं आहे. आरामदायी प्रवास आणि कोकणातून पुढे जाणारी वाट पाहता हा प्रवास नेमका कधी पूर्ण होतो हेच लक्षात येत नाही. अशा या मुंबई-गोवा (मडगाव) वंदे भारत एक्स्प्रेसनं तुम्हालाही प्रवास करायचाय?
