ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या स्कॉर्पिओ गाडीचा रविवारी राळेगणसिद्धी येथे लिलाव झाला.
या लिलावासाठी १५ जणांनी बोली लावली होती. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील प्रवीण लोखंडे यांनी ही गाडी नऊ लाख ११ हजार रुपयांना विकत घेतली. अण्णांनी केलेल्या अनेक आंदोलनात लोखंडेंचा सहभाग होता.
या गाडीच्या लिलावातून मिळालेली रक्कम स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधीत जमा करण्यात येणार आहे. स्कॉर्पिओच्या विक्रीनंतर अण्णांसाठी इनोव्हा गाडी घेण्यात येणार आहे.
जनलोकपाल आंदोलनांसह इतर अनेक आंदोलनादरम्यान अण्णांनी याच गाडीतून प्रवास केला होता. गेल्या सहा वर्षांपासून या गाडीने अण्णांना साथ दिली होती. मात्र आता पाठ दुखीचा त्रास होत असल्याने आण्णांनी ही गाडी विकण्याचा निर्णय घेतला. अण्णा नागपूरमध्ये महाराष्ट्राच्या दौ-यावर असताना या गाडीवर हल्लाही करण्यात आला होता.