राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या ‘कोर्ट’ चित्रपटाने अटकेपार झेंडा रोवला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्करसाठी ‘कोर्ट’ चित्रपट भारतातर्फे अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्याचा निर्णय झाला आहे.
अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर भारतातून होणाऱ्या ऑस्करच्या निवड समितीचे ज्युरी म्हणून आहेत. विविध भाषांमधल्या 30 चित्रपटांमधून कोर्ट चित्रपटाची निवड केली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने या समितीची निवड केली होती.
राजकुमार हिरानीं पीके, नीरज घायवान यांचा मसान, ओमंग कुमार यांचा मेरी कॉम, विशाल भारद्वाजचा हैदर, साऊथचा सिनेमा काक्का मुट्टी आणि बाहुबली या सिनेमांमधून राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कोर्ट या मराठी सिनेमावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
निवड समितीवर असलेले सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
कोर्ट चित्रपटाला 2015 सालाचं सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सुवर्णकमळ देऊन गौरवण्यात आलं होतं. त्यानंतर ऑस्करसाठी भारतातर्फे अधिकृत प्रवेशिका पाठवल्याने कोर्टच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

