शेतरस्त्यासाठी अर्ज करताना सोबत शेतरस्त्याचा कच्चा नकाशा जोडावा लागेल. जिल्हाधिकारी अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित रस्त्याचा अहवाल तहसीलदारांकडून मागवतील, जिल्हाधिकारी शेतरस्त्यासाठी जमिनीचे हस्तांतरण करण्यास परवानगी देतील. या जमिनीच्या विक्री खतानंतर जवळच्या जमीनधारकांना वापरासाठी शेतरस्ता खुला राहील, अशी नोंद सातबारा उताऱ्यावर इतर हक्कात करण्यात येईल. सार्वजनिक प्रयोजनासाठी जमिनीचे भूसंपादन झाल्यानंतर शिल्लक जमिनीच्या हस्तांतरणासाठी अर्ज करताना त्यासोबत भूसंपादनाच अंतीम निवाडा किंवा कमी-जास्त प्रमाणपत्र (कजाप) जोडावे लागेल. त्यानंतर जिल्हाधिकारी कागदपत्रांची पडताळणी करतील आणि हस्तांतरणाला मंजूरी देतील. ग्रामीण घरकूल लाभार्थ्यांसाठी अर्ज करताना जिल्हाधिकारी लाभार्थ्यांची अर्जदाराची ओळख पटविण्याची खात्री करतील. ग्रामीण घरकुलासाठी प्रत्येक लाभार्थ्याला एक हजार चौरस फुटांपर्यंत जमिनीचे हस्तांतरण करण्यास मंजुरी देतील.

विहीर, शेतरस्ता किंवा घरकुलाच्या लाभासाठी जमिनीच्या हस्तांतरणाला जिल्हाधिकारी हे एक वर्षासाठीच मंजूरी देतील किंवा अर्जदाराच्या विनंतीवरून पुढील दोन वर्षांसाठीच मुदतवाढ देता येणार आहे. ज्या कारणासाठी हस्तांतरणाची मंजूरी मिळाली, त्याच कारणासाठी जमिनीचा वापर करणे बंधनकारक आहे. अन्यथा मंजूरी रद्द करण्यात येणार आहे.