सातारा:ज्येष्ठ लेखिका, तत्त्वज्ञानाच्या अभ्यासिका डॉ. अरुंधती खंडकर यांचे निधन

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या कन्या, तत्त्वज्ञानाच्या अभ्यासिका, लेखिका डॉ. अरुंधती चंद्रशेखर खंडकर (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने सिंगापूर येथे दि. १३ मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या मागे बहीण मालती (अमेरिका), बंधू वासुदेव (वाई) आणि अशोक (अमेरिका), अजय (सिंगापूर) ही दोन मुले आहेत. अरुंधती या पूर्वाश्रमीच्या सुमन लक्ष्मणशास्त्री जोशी. त्यांचे शालेय शिक्षण वाई येथे झाले. पुढील शिक्षण त्यांनी पुणे येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथून घेतले. १९५४ मध्ये त्यांनी तत्त्वज्ञान विषयात बी. ए. ऑनर्स ही पदवी घेतली.

पुणे विद्यापीठातून तत्त्वज्ञान व समाजशास्त्र या विषयात त्यांनी एम्. ए. केले. विवाहानंतर त्या मुंबई येथे स्थायिक झाल्या. शीव येथील एस्. आय्. इ. एस. या महाविद्यालयात त्यांनी तत्त्वज्ञान विभागात अधिव्याख्याता, विभागप्रमुख म्हणून काम केले. १९९२ मध्ये त्या उपप्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर त्यांनी हिंदुधर्मावरील प्रबंध पूर्ण करून ‘डॉक्टरेट’ मिळविली. मुंबई विद्यापीठात त्या पदव्युत्तर वर्गांना अर्वाचीन पाश्चात्त्य तत्त्वज्ञान शिकवत असत. इटलीचा राजकीय तत्त्वज्ञ निक्कोलो मॅकिआव्हेली याच्यावरील ‘मॅकिआव्हेलीचा राजा’ (अनुवाद, १९६३), ‘आद्य शंकराचार्य : जीवन आणि विचार (संपादित, १९९७), सॉक्रेटिस ते सीमॉन द बोव्हार अशा २५ पाश्चात्त्य विचारवंत आणि तत्त्वज्ञ यांच्यावरील ‘सूर्य पाहिलेली माणसं’ (२००१), ‘बर्ट्रांड आर्थर रसेल’ (चरित्र), फ्रेडरिक विल्यम नित्शे (चरित्र), ‘स्पिरिच्युअल्स मटेरिअॅलिझम’ (इंग्रजी अनुवाद), ‘तर्कतीर्थ : एक प्रज्ञाप्रवाह’ (१९९५), ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी’ (महाराष्ट्र शिल्पकारमाला, साहित्य संस्कृती मंडळ, २००३), ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी’ (महाराष्ट्र चरित्रग्रंथमाला, गंधर्ववेद प्रकाशन, २०१०), ‘Swimming upstream’  (सहलेखन, २०१९) आदी त्यांचे महत्त्वपूर्ण ग्रंथ होत. नुकतीच २०२३ मध्ये त्यांनी वाई येथे भेट दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *